"नशिबात जर फक्त दुखंच लिहिलं असेल तर." पुढे काय ?

*"नशिबात जर फक्त दुखंच लिहिलं असेल तर..."*
सुनिल पुणे TM 8007939422

"जर माझ्या नशिबात फक्त दुखच लिहिलं असेल, तर मी काय करू?
मी तुमच्याशी भांडण करून जिंकू शकते हो, पण या जिद्दी 'जिंदगी'सोबत लढायचं कसं जिंकू कसं ?"

ही शब्दं एका थकलेल्या, तुटलेल्या, पण अजूनही उभ्या असलेल्या स्त्रीच्या हृदयातून निघाली होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच स्तब्ध हास्य होतं की, जसं प्रत्येक वेदनेनं गालावर एक रेषा कोरलेली असावी आणि डोळ्यांमधून अश्रूंना रस्ता मोकळा करून दिला असावा.

ती कोण होती?
कोणत्याही घरातल्या अंगणात खेळणारी एक चिमुकली मुलगी...
वडिलांच्या खांद्यावर बसून आकाशाला गवसणी घालणारी स्वप्नवेडी...
लग्नाच्या वेळी आनंदानं थरथरणारी साडी...
आई झाल्यावर झोप न घेता बाळाला झोपवणारी...
आणि एक दिवस अचानक घराच्या कोपऱ्यात, स्वतःशीच कुजबुजणारी... "मी आहे तरी कोण?"

ती कुणाच्या जिवनात 'आई' झाली, कुणाच्या आयुष्यात 'पत्नी', कुणाच्या मते 'सून' तर कधी प्रेयसी, कुणाच्या साठी 'कामवाली', पण स्वतःच्या आयुष्यात मात्र एक 'गुप्त वेदना' बनली...

दु:ख?
ते तर तिच्या आयुष्याचं सावलीसारखं पाठलाग करत होतं.
कधी नवऱ्याच्या अवहेलनेतून,
कधी सासरच्या टोमण्यांतून,
कधी पोरांच्या दुर्लक्षातून,
तर कधी स्वतःच्या इच्छा गाडून टाकण्याच्या आदतीतून...

तिची वेदना कुठं मांडणार?
जेव्हा ती रडायची, तेव्हा म्हणायचे... "कसले नाटक चाललेय?"
जेव्हा गप्प बसायची, तेव्हा म्हणायचे.... "काय अहंकार बघा हिचा!"
जेव्हा बोलायची, तेव्हा म्हणायचे...."सतत तक्रार का?"
आणि जेव्हा ती आवाज बंद करून मनात गोंजारायची स्वतःला...
तेव्हा तिच्या डोळ्यांतच दुःखाची संपूर्ण कथा दिसायची...

जिंदगी?
तिला कुणी पाठिंबा दिला नाही, पण तिनं दिलाय मुलांना, नवऱ्याला, घराला, सगळ्याला...
आणि स्वतःला ?
स्वतःला रोज आरशात पाहिलं की प्रश्न विचारायची  ती.. "तू अजून का टिकून आहेस?"
ती रोज नव्यानं तुटायची, रोज नव्यानं जगायची.
का?
कारण तिच्या हसण्याने घरातल्यांना समाधान मिळायचं. तिच्या अश्रूंनी नाही.

शेवटी एकदिवस...
तिनं साऱ्या वेदनांनं भरलेलं एक पत्र लिहिलं –
"माझं अस्तित्व कधीच नव्हतं तुमच्यासाठी,
पण मी होती म्हणून तुमचं जग जगायचं होतं.
तुमचं घर, तुमचं बाळ, तुमचं यश...
पण माझं काय?"

आणि निघून गेली...
नाही... मरणाने नाही,
तर मनानं मरण पत्करून...
शरीरानं मात्र अजूनही घरात भांडं घासताना, स्वयंपाक करताना, चहा करताना,  अस्तित्व दाखवत आहे...

तीच ती स्त्री आहे,  आज आपल्या घरात आहे, आपल्याच आईच्या स्वरूपात, बहिणीच्या, बायकोच्या, प्रेयसीच्या, मुलीच्या...रूपात
ती दिसते हसरी, पण आतून कोसळलेली आहे...

जर या लेखातलं दुःख जर तुमचं वाटलं...
तर एकदा तिला मिठी मारा, सोबत करा.
कदाचित तुम्ही तिचं आयुष्य बदलू शकाल.

लेखक: सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com 
(प्रत्येक वेदनांना शब्दात मांडण्याचा प्रयत्न करणारा एक लहानसा लेखक)

Comments

Popular posts from this blog

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"