आजारी पतीचे पत्नीस शेवटचे पत्र

*आजारी पतीचे पत्नीस शेवटचे पत्र....सुनिल पुणे TM 8007939422.*

प्रिय सखी, प्रिय पत्नी,

अखेरची वेळ जवळ आली आहे, हे आता स्पष्ट जाणवतंय.
श्वास आता हळूहळू मंदावत चाललाय... आणि त्याच प्रत्येक श्वासात तुझं प्रेम साठून राहिलंय.

हे पत्र तुला तेव्हाच मिळेल, जेव्हा मी या जगात नसेन.
पण प्रत्येक ओळीतून, प्रत्येक शब्दातून, मी तुझ्या जवळ असणार आहे.

आपण दोघांनी मिळून हा संसार फुलवला.
तुझ्या प्रेमाने, सहनशीलतेने, आणि हसऱ्या चेहऱ्याने प्रत्येक अडचण पार केलीस.
आज हे सगळं आठवताना, माझ्या डोळ्यांतून अश्रू येतात… पण ते दु:खाचे नाहीत, कृतज्ञतेचे आहेत.

तू माझी सावली झालीस,
कधी आईसारखी काळजी घेतलीस,
कधी सखी बनून माझ्या मनातलं ओझं हलकं केलंस,
कधी माझ्या चुका समजून घेत तुझं मौन बोलकं केलंस.

तुला सोडून जाणं हीच माझी सर्वात मोठी हतबलता आहे.
माझ्या अनुपस्थितीत, तू स्वतःला सावरशील अशी मला पूर्ण खात्री आहे…
पण तरीही माझं मन अस्वस्थ होतं कारण तुला एकटं सोडून चाललोय.

माझ्यानंतरही तू स्वतःची काळजी घे.
वेळेवर खा, विश्रांती घे…
कारण हे सगळं सांगणारा आता तुझ्या आजूबाजूला नसेल.
पण माझं अस्तित्व तुझ्या मनात असेल…
माझं प्रेम, माझी आठवण, माझा विश्वास हे सगळं तुला आधार देत राहील.

मुलांच्या चेहऱ्यावरून माझं प्रतिबिंब पाहशील.
त्यांच्यासाठी तू अजून अधिक मजबूत होशील,
तुझ्या डोळ्यांतून अश्रू ओघळले तरी, हसून त्यांना धीर देशील…
आणि मी वरून पाहत असेन  अगदी अभिमानाने.

माझ्या चुका, राग, प्रसंगी केलेलं दुर्लक्ष…
कधी दुखावलीस असेन तर क्षमा कर.
कारण मी पूर्ण नव्हतो, पण तुझ्या प्रेमाने संपूर्ण वाटायचो.

तू म्हणायचीस ना, "अजून किती वर्षं एकत्र राहू आपण?"
आज उत्तर देतो,  जन्मभरासाठी पुरेसे नव्हते हे क्षण!

तुझ्या आयुष्यात पुढे कोणी नील आला, तुला प्रेमाने सांभाळायला,
तर मागे वळून पाहू नकोस.
माझं प्रेम तुला अडवायला नाही तर तुला उभं करायला आहे, हे लक्षात ठेव.

माझा फोटो ठेव, पण रोज नमस्कार करण्याची गरज नाही…
फक्त एखाद्या दिवशी तुझ्या मनात थोडी हुरहुर वाटली,
तेव्हा माझी आठवण येईलच,
तुला गोड हसवायला, हलकीशी मिठी देण्यासाठी.

शेवटी एवढंच सांगतोय,
माझं शरीर जाईल, पण मी तुझ्या आठवणीत जिवंत राहीन.
तुझ्या स्वप्नांमध्ये, तुझ्या रोजच्या अस्तित्वात…
मी नेहमीच तुझ्यासोबत असेन.

तुझाच,
जीवापाड प्रेम करणारा
एक पती

लेखक सुनिल पुणेTM  9359850065, sunilpunetm.blogspot.com
✍️💔

"हे पत्र फक्त शेवटचं निरोपवचन नाही, तर एका पतीचं त्याच्या पत्नीवरील अखेरपर्यंतचं प्रेम, विश्वास, आणि जिव्हाळ्याचं प्रमाणपत्र आहे."

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

पहिलं प्रेम चुकीच्या व्यक्तीशी तर दुसरं प्रेम चुकीच्या वेळेला होते...