आयुष्याला लाभलेली प्रेमाची, पुण्याईची फळे…

आयुष्याला लाभलेली प्रेमाची, पुण्याईची फळे…सुनिल पुणे TM 8007939422

आयुष्यात अनेक नाती येतात… काही आपली असतात, काही केवळ नावापुरती. पण कधीतरी एक असा जीव भेटतो… जो तुमच्यावर मनापासून प्रेम करतो. कोणताही स्वार्थ न बाळगता, कोणतीही अपेक्षा न करता... फक्त आणि फक्त तुमच्यासाठी जगणारा.

तो किंवा ती तुमच्यावर प्रेम करतो म्हणजे काय हो ?
तर तुमच्यासाठी वेळ राखून ठेवतो,
तुमच्या पाठीमागे सतत उभं राहतो,
तुमचा रागही प्रेमानं सहन करतो, तुमच्या यशात फुलतो आणि तुमच्या अश्रूंना स्वतःच्या डोळ्यांत सामावतो.

स्त्रीचं प्रेम कसे तर,  ते मुळापासून निःस्वार्थ असतं. ती जेव्हा प्रेम करते तेव्हा ती तिचं सगळं अस्तित्व त्यात ओतते. ती फक्त तुमची सखी नाही तर ती तुमचं सुख-दुःख ओळखणारी एक सजीव भावना असते. ती तुमच्या सवयींमध्ये रमते, तुमच्या चुकांवर प्रेम करते, आणि तुमच्या प्रत्येक क्षणात स्वतःला गुंफून टाकते.

पुरुषाचं प्रेम कसे तर,  ते जरा अबोल असतं, पण खोलवर रुजलेलं असतं. तो कदाचित रोज "आय लव्ह यू" म्हणणार नाही, फोन करणार नाही, पण त्याच्या कृतीतून ते प्रेम ओसंडतं. तुमच्यासाठी धावत येणं, तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी झटणं… हीच त्याची प्रेमाची भाषा असते...त्यात दोघांचं प्रेम हे गुलाबाच्या फुलासारखं नसतं की नेहमी दाखवता येईल, ते वटवृक्षासारखं असतं जसे जमीनीवर घट्ट पाय रोवून उभं असलेलं, सावली देणारं, संरक्षण करणारे असते !

स्त्री असो किंवा पुरुष, प्रेम एकच शिकवते ते म्हणजे समर्पण.

आजच्या या धकाधकीच्या युगात, जिथे नातं टिकवणं एवढंच मोठं आव्हान बनलंय,
तिथे जर कोणी एकजण असं प्रेम करत असेल, मनापासून काळजी घेत असेल, तुमच्या सवयींमध्ये गुंतलेला असेल, तुमच्यासाठी दिवस रात्र एक करत असेल, तर ती व्यक्ती म्हणजे तुमचं अस्तित्वात आहे, तुमचे काही तरी पुण्य आहे. अशा नात्याला कधी दुर्लक्ष करू नका. ते नातं जपा, त्याला फुलवा…
कारण अशी माणसं रोज भेटत नाहीत…ती देवाकडून मिळालेल्या प्रसादासारखी असतात.

खर प्रेम करणारी माणसं ही नशिबाने मिळतात 
आणि त्यांना जपणं ही आपली जबाबदारी असते.
म्हणूनच...ती व्यक्ती कोणीही असो स्त्री किंवा पुरुष, जर ती तुमच्यावर खरं प्रेम करत असेल, तर तिच्यावर तुमच “जगणं” उधळा…कारण प्रेम हे मरणानंतर आठवणीचं रूप घेतं आणि त्या आठवणींना आपणच "अमर" करू शकतो… आपल्या वागण्यातून!

प्रेम म्हणजे केवळ भावना नाही तर तो जीवनाचा एक गाभा असतो.

सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?