"ती... तडजोडीत हरवलेली एक जीवन कविता"

*"ती... तडजोडीत हरवलेली एक जीवन कविता"*
लेखक: सुनिल पुणे TM 8007939422

"ती" कोण आहे?
कधी आई, कधी बहीण, कधी पत्नी वा प्रेयसी, कधी सून, कधी मुलगी, कधी सहकारी...
पण स्वतःसाठी ती कधीच ‘फक्त एक स्त्री’ राहू शकली नाही.

प्रत्येक नातं ती निभावते,
प्रत्येक जबाबदारी तिनं हसत घेतली.
तिला शिकवण्यात आलं आहे की.. "तू एकत्र ठेवणारी आहेस, तू तुटलीस तर घर मोडेल."
पण तिला कोणी विचारलंच नाही, "तू ठेच लागल्यावर कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवशील?"

ती रोज हरवते असते..
स्वतःच्या आयुष्यातून,
स्वतःच्या आवडीतून,
स्वतःच्या ओळखीतून…
पण कुणालाच तिचा शोध घ्यावासा वाटत नाही.

तिचा संसार म्हणजे एका न दिसणाऱ्या मनोऱ्यावर उभा केलेला किल्ला असतो,
जिथे तिच्या इच्छा विटा होतात, आणि त्यावरच दुसऱ्यांच्या अपेक्षांचा गिलावा चढतो.

ती शिकलीय की समजून घ्यायचं काम हे तिचंच,
माफ करायचं काम तिचंच,
थांबायचं, वाट बघायचं, समजूत काढायचं… सगळं तिचंच.

कारण समाजाच्या मते तिचं आयुष्य हे तिचं नाहीच –
ते तिच्या घरासाठी, नात्यांसाठी, संस्कृतीसाठी दिलेलं एक “बलिदान” आहे.
तडजोड ही तिच्या बांगड्यांइतकीच सहज स्वाभाविक मानली जाते.

ती रडू शकत नाही,
कारण मग ती कमकुवत ठरेल.
ती बोलू शकत नाही,
कारण मग तिला तोंडचट समजतील.
ती थोडीशी जास्त हसायला लागली,
तर लगेच प्रश्न विचारले जातील.. "हे काय सुरू आहे?"

तिच्या नशिबात का नेहमीच "जुळवून घेणं" लिहिलं जातं? कारण तिचं नावच समाजानं बदलून ठेवलं आहे..ते 
तडजोड
ती "प्रेम" दाखवते तर ती "गोड" वाटते,
ती "मत" मांडते तर ती "जास्तच बोलकी" ठरते,
ती स्वतःच्या जगण्यासाठी उभी राहते,
तर म्हणतात.. “बदलली हाय!”

कधी तिचा दिवस घरासाठी संपतो,
कधी रात्र मुलांच्या अभ्यासात.
ती न कंटाळता मदत करत राहते, 
नित्यनवीन भूमिका, नित्यनवीन जबाबदाऱ्या...आणि त्यातच ती विसरते की,
ती देखील एक "स्वप्न पाहणारी" होती,
एक "बाहुल्या खेळणारी मुलगी" होती,
ती देखील कधीतरी कुणाचं लेकरू होती...

म्हणून आज, या क्षणी मी (सुनिल पुणे) हा लेख त्या प्रत्येक स्त्रीला समर्पित करतो, 
जिच्या तडजोडीवर समाज उभा आहे,
जिच्या धीरावर घर चालतं,
जिच्या न बोलण्यात एक आक्रोश असतो,
आणि जिच्या हसण्यात एक गुप्त वेदना असते. ती ‘स्त्री’ आहे...
ती चालते, पण थांबत नाही,
ती रडते, पण उभी राहते,
ती हरवते, पण संपत नाही...
कारण ती तडजोड करत करत,
"एक जग जगवणारी कविता" बनलेली असते.

लेखक: सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com 
(स्त्रीच्या न बोललेल्या भावना शब्दांत बांधण्याचा एक नतमस्तक प्रयत्न)

Comments

Popular posts from this blog

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"