स्वातंत्र्य की स्वैराचार?
*कथा: स्वातंत्र्य की स्वैराचार?*
लेखक: Sunil Pune TM 8007939422,
गावाकडील सुनिल नावाचा मुलगा पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिक्षणासाठी आला. घरच्या चांगल्या संस्कारात वाढलेला सुनिल थोडासा गोंधळलेला होता, पण अभ्यासात लक्ष केंद्रित करून तो स्वतःला सिद्ध करायच्या तयारीत होता. शहराचं वेगळं वागणं, बोलणं, राहणं सगळंच त्याच्यासाठी नवीन होतं. पण त्याने संयम ठेवला.
कॉलेजमध्ये त्याची ओळख झाली तनिषा नावाच्या एका आधुनिक विचारसरणीच्या मुलीशी. सुरुवातीला ती सुनिलच्या साधेपणावर हसायची, पण हळूहळू त्याच्या शांत, समजूतदार स्वभावाकडे तिचं लक्ष गेलं. दोघांमध्ये मैत्री वाढली, वेळ घालवणं सुरू झालं आणि तीच मैत्री प्रेमाच्या दिशेने वळू लागली.
एक दिवस तनिषाने थेट सुनिलला विचारलं, "तुला माझं खरंच आवडतंय ना? मग आपल्या प्रेमात अंतर काय हवं?"
सुनिल आश्चर्यचकित झाला. त्याच्या डोक्यात प्रेम म्हणजे लग्न, जबाबदारी, एक नातं तर तनिषासाठी प्रेम म्हणजे जवळीक, भावनिक आणि शारीरिक दोन्ही.
तनिषाने त्याला तिच्या रूमवर बोलावलं. वातावरण रोमँटिक होतं, पण त्या क्षणी सुनिल थोडा गोंधळला. तरीही भावनेच्या ओघात तो थांबला नाही. त्याला कल्पना नव्हती की कोणीतरी त्या भेटीचे व्हिडीओ चोरून काढत होतं, ज्याचा वापर पुढे ब्लॅकमेलसाठी केला जाणार होता.
दोन आठवड्यांनी सुनिलला एक मेसेज आला "हे बघ, तुझ्या आणि तनिषाच्या त्या रात्रीचे व्हिडीओ आमच्याकडे आहेत. जर तू पैसे नाही दिलेस तर हे तुझ्या आईवडिलांना पाठवू."
त्याचं काळीज धडधडलं. घाबरलेला सुनिल लगेच तनिषाशी संपर्क साधायला गेला, पण ती गायब होती. कॉलेज सोडलं होतं. रूमवर दुसरी मुलगी राहायला आली होती.
शेवटी सुनिल ने हिम्मत करून पोलिसात तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी तपास करून मोठ्या फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश केला. अनेक तरुण मुलं अशा प्रकाराने अडकवली जात होती फसवून व्हिडीओ घेणं, आणि मग ब्लॅकमेल करणं.
या सगळ्या प्रसंगानंतर सुनिल पूर्णपणे बदलला. तो आता केवळ अभ्यास करणारा नव्हता, तर स्वतःच्या अनुभवातून समाजाला जागवणारा युवक बनला होता. त्याने कॉलेजमध्ये व्याख्यानं घेणं सुरू केलं.
तो तरुणांना स्पष्ट सांगू लागला "प्रेम म्हणजे फक्त आकर्षण नाही, ते एक जबाबदारी आहे. शरीराच्या जवळीकाआधी मनांची जवळीक महत्त्वाची असते. 'फ्री सेक्स' ही संकल्पना सध्या रुजते आहे, पण त्याचे दूरगामी परिणाम खूप घातक आहेत."
सुनिल सांगायचा, "आपले पूर्वज वयात आल्यानंतरच लग्न लावून देत असत. त्यांना माहिती होतं की वय, तारुण्य आणि त्याचं मागणं यामध्ये समतोल हवा. आज शिक्षणाच्या नादात लग्न उशीर होतं, पण शरीराचं तारुण्य उशीर करत नाही. त्यामुळे आज समाजात फसवणूक, ब्लॅकमेलिंग, व्यभिचार यांचं प्रमाण वाढतंय."
त्याचं एक वाक्य खूप प्रसिद्ध झालं
"नातं असावं ते नाजूक फुलासारखं ज्यात सुगंध असेल, काटे नव्हे."
आज सुनिल एक तरुण समाजसेवक आहे. तो आधुनिक विचाराला नाकारत नाही, पण संस्कार विसरणं म्हणजे आधुनिकता नाही हे समजावून सांगतो.
शेवटी एकच प्रश्न…
स्वातंत्र्य हवंच, पण स्वैराचार हवाय का?
आधुनिक होणं म्हणजे नैतिकता सोडणं असतं का?
की, आपल्या संस्कृतीला नव्या भाषेत सांगून, ती टिकवणं हेच खरं शिक्षण असावं?
सुनिल पुणे TM. 9359850065. sunilpunetm.blogspot.com
(परिक्षक, छायाचित्रकार, विचारवंत आणि समाजप्रबोधन करणारा लेखक)
Comments
Post a Comment