"स्त्री जन्मा, तुझी अधुरीच एक कहाणी..."
"स्त्री जन्मा, तुझी अधुरीच एक कहाणी..."
लेखक – सुनिल पुणे TM 8007939422
ती एक हुशार मुलगी होती… डोळ्यांत मोठी स्वप्नं, मेंदूत बुद्धिमत्तेचा प्रकाश, आणि हृदयात आईवडिलांच्या स्वप्नांचं ओझं… सैनिकी घरात जन्मलेली. लहानपणापासून शिस्तीत वाढलेली. अभ्यासात ती इतकी हुषार की शिक्षकही तिच्या उत्तरांनी अचंबित व्हायचे. १२वीपर्यंत सायन्समध्ये उत्तम गुणांनी शिक्षण घेतलं… पण वडिलांच्या एका निर्णयाने आयुष्याचा प्रवाहच बदलून गेला.
त्यांच्या इच्छेनुसार FYBCom ला प्रवेश घेतला… पण दुसऱ्या वर्षातच म्हणजे SYBCom करत असतानाच तिचं लग्न लावून देण्यात आलं. ती विरोध करू शकली नाही, कारण मुलींना निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य फार कमी वेळा दिलं जातं… तिने मनातली स्वप्नं गिळली, आणि सासरी पाऊल टाकलं.
लग्नानंतर तिचं नवीन आयुष्य सुरू झालं… पण ते स्वप्नवत नव्हतं, ते वास्तव होतं… एकाच खोलीत 6 जण राहत होते. तिथंच खाणं, तिथंच झोपणं, तिथंच संसार. हनीमूनचं स्वप्न तिने मनातच पाहिलं होतं, पण प्रत्यक्षात तेही चोरूनच झालं… जणू एखाद्या गुन्ह्यासारखं.
लग्ना नंतर काही दिवसांतच नंणद बाळंतपणासाठी माहेरी आली. जागेचा प्रश्न गंभीर झाला. घरातल्या एकाच खोलीत आता सगळं कसं जमवणार? मग तिने आणि तिच्या पतीने गोठ्यातल्या एका कोपऱ्यात राहण्याचा निर्णय घेतला. चार जुन्या साड्या टांगून आडोसा तयार झाला… आणि त्या साड्यांच्या पलीकडे त्यांचा ‘नवरा-बायको’चा संसार सुरू झाला.
त्या आडोशामागे नव्हतं काही स्वप्निल… नव्हतं गुलाबांचं गालिचं… होता फक्त गायी म्हशींचा वास, ओलसर जमीन, कधीकधी शेणाचं उग्र अस्तित्व, आणि त्यात दोघांची दोन उबदार मनं. तिथंच तिचं पहिलं हसू उमललं, आणि पहिलं अश्रू गळालं....लवकरच तिला समजलं पतीकडे ना नोकरी आहे, ना स्थिर व्यवसाय. एक छोटंसं स्पेअर पार्ट्स दुकान पण तेही तोट्यात चालत होतं. पैशांची वाणवण वाढली. तिच्या वडिलांनी लग्नात दिलेले दागिने विकले गेले. ते दागिने तिच्यासाठी साज नव्हते, ते तिचं भविष्य होतं, पण तेही तिने स्वतःच्या हाताने गमावलं संसारासाठी.
असे दिवस जात होते. एक मुलगी झाली, दुसरी मुलगी झाली… संसार वाढत गेला, तशी ताणतणावांची भिंतही उंचावत गेली. तिसरा मुलगा झाला तेव्हा तर परिस्थिती आणखी बिकट झाली. त्या एका खोलीत तीन मुलं, नवरा, सासरचं कुटुंब, आणि तिचा आत्मा… सगळं दाटून गेलं होतं.
पतीला काही आर्थिक स्थैर्य मिळालं नाहीच. एक दिवस अचानक, मोठ्या मुलीच्या पळून लग्न केल्याच्या धक्क्याने, त्याला हार्ट अॅटॅक आला आणि तो कायमचा निघून गेला. त्या एका क्षणात तिच्या आयुष्यातली सर्व छावणी ढासळली…आणि ती वयाच्या 40शीतच "विधवा" झाली........ .!
ती आता एकटी होती एक विधवा. डोक्यावर छप्पर होतं, पण आधार नव्हता. तीन मुलं, एक वेदनांनी भरलेली स्त्री, आणि हातात काहीच नव्हतं. माहेरकडून सहानुभूती नव्हती… उलट, विधवा म्हणून पाठ फिरवली गेली. समाजाने 'सुहासिनी' नसल्याची शिक्षा दिली… जणू सती जाणार नाही, म्हणून अपमानास पात्र ठरली.
पण ती झुकली नाही. ती खंबीर होती. तिने अकाउंटचं शिक्षण घेतलं. नोकरी मिळवली. दिवस-रात्र एक करत मुलींना मोठं केलं. त्यांचं लग्न केलं. अजून मुलगा शिक्षण घेतोय… सध्या ती आणि तिचा मुलगा एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहतात. खिडकीजवळ एका कोपऱ्यात तिच्या जुन्या साड्यांचा आडोसा अजून जपून ठेवला आहे… कारण तिथंच तिने जगायला शिकलं.
एकटेपणा आता सहचर झालाय. शरीर थकलंय, पण मन अजूनही धगधगतंय. अनेकदा वाटतं राहत, का नाही मिळू शकत एक आधार… एक जोडीदार? पण समाज अजूनही तिच्या आयुष्याचा दुसरा अध्याय लिहू देत नाही. विधवेला प्रेमाची परवानगी नाही, companionship ची गरज नाही, असं त्यांना वाटतं. तरी ती लढतेय… अजूनही. डोळ्यात पाणी आहे, पण त्यात लाचारी नाही, तर संघर्षाची शिडी आहे. अश्रूंच्या धारेत ती मूक आवाजाने ओरडत असते..
"मीही माणूस आहे… माझंही मन आहे… माझंही हसणं, माझंही रडणं, माझीही स्वप्नं आहेत."
स्त्री जन्मा…
तुझ्या डोळ्यांतून वाहते इतिहासाची नदी,
तुझ्या पदरात दडलेली असते बाळाची भूक,
तुझ्या कुशीत विसावतो थकलेला पती,
आणि तरीही, तू एकटी पडतेस…
एकटी जगतेस…
एकटी लढतेस…
आणि तरीही, समाजाला वाटतं,
"तूला अजूनही हे दुख कमीच आहे."
ही एक कथा नाही… ही असंख्य अशा स्त्रियांची सत्य शोकांतिका आहे, जी वाचली जाते, पण समजली जात नाही. ही त्या प्रत्येक स्त्रीची हाक आहे… जिच्या पदराआड स्वप्नं गळून पडतात, आणि तरीही ती दिवा विझू देत नाही.
सुनिल पुणे TM 9359850065. sunilpunetm.blogspot.com
(स्त्रियांच्या संघर्षांना समर्पित)
Comments
Post a Comment