आधुनिक युगात लग्नसंस्थेचं बदलतं स्वरूप

*आधुनिक युगात लग्नसंस्थेचं बदलतं स्वरूप – एक चिंतन,  सुनील पुणे TM 8007939422*

आजचा काळ हा डिजिटल आणि मोबाईलच्या वेगवान युगाचा आहे. या काळात माणसांचे विचार, गरजा आणि आयुष्य जगण्याची पद्धत झपाट्याने बदलत आहे. याचा थेट परिणाम आपल्यासारख्या पारंपरिक भारतीय समाजातील "लग्नसंस्था" या मूलभूत घटकावर होत आहे.

पूर्वी लग्न म्हणजे दोन कुटुंबांचा, दोन विचारधारांचा, दोन जीवनशैलींचा एकत्र येणं असायचं. संस्कार, संयम, सहवास, समर्पण आणि सहकार्य या आधारावर संसार उभा राहत असे. पण आज, ही परंपरा एका वेगळ्याच वळणावर उभी आहे.

आजची तरुण पिढी  मुलं आणि मुली  आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत. शिक्षण, नोकरी, करिअरच्या संधीमुळे त्यांना स्वातंत्र्य मिळालंय. यामुळे लग्नाच्या बाबतीतही त्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. कुणी प्रेमविवाह करतंय, कुणी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतंय, तर कुणी लग्नच नको असं स्पष्टपणे सांगतंय.

या बदललेल्या जीवनशैलीत ‘एकत्रित कुटुंबपद्धत’ ही संकल्पना हरवत चालली आहे. या पद्धतीत पती-पत्नीला मार्गदर्शन, आधार आणि जबाबदारी यांचा भक्कम पाठिंबा मिळत असे. आज ती साथ आणि समजूत नाहीशी झाल्याने अनेक नाती अल्पजीवी ठरत आहेत.

स्त्रिया आता फक्त गृहिणी नाहीत तर यशस्वी उद्योजिका, अधिकारी, डॉक्टर्स, इंजिनिअर्स आहेत. आर्थिक स्वावलंबनामुळे त्यांना फारकत घेणं, घटस्फोट घेणं सोपं वाटू लागलंय. यामागे केवळ आर्थिक बाजू नाही, तर भावनिक सहकार्याचा अभाव, अपेक्षांचं ओझं आणि संवादाचा अभाव हेही मोठे कारण आहे.

संसार, नाती, मूलं या सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय. शारीरिक गरजा भागवण्यासाठी लग्नाशिवायही अनेक पर्याय खुले आहेत, जे पूर्वी वर्ज्य मानले जात. त्यामुळे आता ‘लग्न’ ही एक भावनिक नात्याची गोष्ट न राहता, केवळ व्यवहारिक करार वाटतो.

या सगळ्या परिस्थितीकडे आपण निष्पक्ष नजरेने पाहायला हवं. बदल अनिवार्य असतो, पण त्या बदलात आपण आपले मूल्य, संस्कार, समज, समर्पण आणि सहकार्य हे गुण हरवून बसतोय का? याचा विचार करणं गरजेचं आहे.

माझा उद्देश कुणालाही दोष देणे नाही, तर फक्त एक प्रश्न विचारणे आहे 
"आपण स्वातंत्र्याच्या नावाखाली नात्यांचा आत्मा तर गमावत नाही ना?"

आपल्याला आधुनिकतेची वाट चालायचीय, पण त्यात भारतीय कुटुंबसंस्थेची शालीनता, आपुलकी आणि सुसंवाद जपायला हवाय. कारण नातं हे व्यवहार नसून, भावना आणि विश्वासाचा सेतू आहे.

सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com 
( महाराष्ट्र पोलिस अकॅडमी व MIT कॉलेज येथे परिक्षक, फाईन आर्ट, फोटोग्राफी, ऑफसेट क्षेत्रात मॅनेजर, अभ्यासक, लेखक, समुपदेशक )

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?