पत्नी असूनही नसल्यासारखीच… एका पतीचे मौन मनोगत
पत्नी असूनही नसल्यासारखीच… एका पतीचे मौन मनोगत
✍️ Sunil Pune TM
ती घरात असते… पण संवाद हरवलेला असतो. ती बोलते, पण शब्दात आपुलकीचा ओलावा नसतो. तिचं अस्तित्व आहे, पण साथ नाही, समजूत नाही, सोबत तर दूरची गोष्ट.
एकेकाळी तिच्या हास्याने घर उजळून निघायचं. आज तेच घर दडपणात गुदमरतं. तिच्या डोळ्यांत असणाऱ्या स्वप्नांची जागा आता शंका आणि उपेक्षेने घेतली आहे. पत्नी आहे, पण पती म्हणून माझं अस्तित्व तिच्या दृष्टीनं निरर्थक झालं आहे.
कधी कधी वाटतं, ही सहजीवनाची नाती इतकी कोरडी, इतकी एकांगी का झाली? मी दोषी असेनही काही ठिकाणी… पण संवादाने मार्ग निघाला असता. समजुतीने नातं वाचलं असतं. पण ती दूर जात गेली, आणि मी थांबलो एकटाच.
आजची सगळी कायदेशीर व्यवस्था, अगदी कायदाही, एकतर्फीपणे तिच्या बाजूने झुकलेला वाटतो. माझे मनोधैर्य, माझ्या भावना, माझं दुःख... कुणाच्या खिजगणतीत नाहीत.
तिने “नाही” म्हटल्यावर माझं “हो” ही दुय्यम ठरतं. मी पती असलो तरी, माझ्या इच्छांना, स्वाभिमानाला, वेदनांना मूल्य उरलेलं नाही.
फारकत म्हणजे सुटका असावी असं वाटतं, पण ती सुद्धा वेळखाऊ, त्रासदायक आणि सामाजिकदृष्ट्या लज्जास्पद वाटणारी. अनेक वेळा पुरुषांनी मूकपणे सहन करणं पसंत केलंय… कारण फाडफाड बोलणाऱ्याला सहानुभूती मिळते. शांत राहणारा दोषी ठरतो.
मी कसला गुन्हा केला? एवढंच ना, आयुष्यभर एका चांगल्या नात्याची अपेक्षा ठेवली. तिचा आदर केला, स्वातंत्र्य दिलं, आणि आजही तिच्या सुखासाठी मीच गप्प आहे. पण कुणी विचारतो का, ‘तुझंही मन आहे का रे?’
हे मनोगत कुठल्याही एका पतीचं नसून, हजारो त्या पुरुषांचं आहे जे नात्यात असूनही एकटेपणात जगत आहेत. न्यायासाठी धाव घेतात, पण न्याय सुद्धा एकतर्फी वाटतो.
कधी वाटतं, पुरुषांनीही आपले भाव मांडावे, मन मोकळं करावं, पण सभ्यतेच्या चौकटीत… कारण आपणही माणूस आहोत, यंत्र नाही.
सुनिल पुणेTM 9369850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment