ती... एक चालतीफिरती कविता!
"ती... एक चालतीफिरती कविता!" सुनिल पुणे TM 8007939422
ती जन्माला आली, तेव्हा कोणीतरी घरात कुजबुजलं… “पुन्हा मुलगीच का झाली?”
ती हसली नव्हती, पण तिचं अस्तित्व गालबोट ठरलं… तरीही तिने श्वास घेतला, कारण नियतीला माहीत होतं की एक दिवस हीच मुलगी इतिहास लिहिणार आहे.
ती बालपणी खेळली, तिच्या बाहुल्यांना लग्नं लावली, पण तिला स्वतःचं लग्न लावायला जगानं पायजम्या घातल्या.
तिच्या डोळ्यांमध्ये स्वप्नं होती, पण जगानं तिला “कर्तव्य” नावाचं बिंधास्त ओझं दिलं.
तिने आई होण्याच्या वेदना सहन केल्या, पण स्वतःच्या वेदना कुणाला जाणवू दिल्या नाहीत.
ती कुठेही असो, शेतात असो, ऑफिसात, स्वयंपाकघरात, प्रयोगशाळेत, अथवा रणांगणात, ती नेहमीच दुसऱ्यांसाठी लढत राहिली.
कधी तिने चुलीवर भाकरी थापली, तर कधी कल्पनांच्या विस्तवावर विज्ञान शिजवलं.
कधी तिने पायात बांगड्या वाजवल्या, तर कधी काळजाच्या तारा छेडून शांतता पेरली.
तिला कोणी “कमकुवत” म्हटलं, पण तिने वेळ आल्यावर अख्खं कुटुंब पाठीवर उचललं.
तिला कोणी "भावनाशील" म्हटलं, पण संकटात तीच बिनधास्त उभी राहिली.
तिला कोणी “मुलगी” म्हणून मर्यादा दाखवल्या, पण तिने त्या मर्यादांना संधी बनवलं.
ती कधी सासूची सून होती, कधी आईची मुलगी होती,
कधी नवऱ्याची ‘बायको’, पण नेहमी स्वतःची सावली होती…
ती वाचत गेली, नजर चुकवणाऱ्या पुरुषांची मूक भाषा,
ती समजत गेली, मुलाच्या डोळ्यातली उद्याची चिंता,
ती सोसत गेली, संसाराचा नाजूक धागा,
पण तरीही, ती "ती" राहिली, स्वतःच्या अस्तित्वाची कविता.
तिच्या आयुष्याला कुठेच पूर्णविराम नाही,
कारण ती प्रत्येक वळणावर नवी सुरूवात करते.
ती रडली, पण अश्रूंना कोणी पाहिलं नाही.
ती थकली, पण हातातल्या कामाला थांबू दिलं नाही.
ती हसतेच… हो, एक अस्सल आईचे कधी बायकोचे, मुलीचे तर कधी मैत्रिणीचे हसू…
जे स्वतःसाठी नसतं, पण जगाला उभं ठेवण्यासाठी पुरेसं असतं.
ती आहे… एक चालतीफिरती कविता…
जिचं काव्य कुणी पूर्ण लिहू शकणार नाही…
आणि तिला समजून घेण्याची भाषा अजून जगानं शिकलेलीच नाही…
म्हणूनच...
ती जगातली सर्वात जिवंत, सर्वात समृद्ध आणि सर्वात दुर्लक्षित कलाकृती आहे.
सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment