स्त्रीचं अंतर्मन : बायको आणि प्रेयसी यांचं न बोललेलं, पण खरं मन
*स्त्रीचं अंतर्मन : बायको आणि प्रेयसी यांचं न बोललेलं, पण खरं मन*
लेखक सुनिल पुणे TM
मी बायको आहे…
पण त्याचबरोबर मी एक स्त्रीही आहे…
कधी साडीच्या घडीत गुंतलेली, कधी बांगड्यांच्या आवाजात हरवलेली,
कधी फुलांच्या माळांमध्ये ओळख विसरलेली,
तर कधी स्वयंपाकघरात स्वतःच्या स्वप्नांना मंद आच दिलेली...
मी प्रेयसी होते…
कधी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवणारी,
कधी त्याच्या एका फोनसाठी अख्खं दुपार वाट पाहणारी,
कधी डोळ्यांत काळजी, ओठांवर हास्य आणि मनात स्वप्न घेऊन झोपी जाणारी.
बायको झाल्यावर प्रेम संपत नाही…
फक्त त्याचं रूप बदलतं…
कधी टिफिनमध्ये प्रेमाचं पोषण भरून पाठवतं,
कधी ताप आलेल्या नवऱ्याच्या कपाळावर थंड फडके ठेवतं,
कधी 'उगाच उशीर होतोय' म्हणून मनात हजार शंका घेऊनही काही न बोलता वाट पाहत बसतं.
मी आजही त्याची प्रेयसी आहे…
पण मी आता त्याचं घरही आहे, त्याची जबाबदारीही.
त्याच्या आईवडिलांची सून, त्याच्या मुलांची आई, आणि तरीही त्याच्या आयुष्यातील पहिलीच आणि शेवटची 'ती' राहायचं स्वप्न पाहणारी.
कधी रागावते, कधी अबोला धरते,
पण मनात कुठेतरी अजूनही त्याच्या हातात हात गुंफून मोकळ्या आकाशात चालायचं स्वप्न आहे.
माझं मन कुणी वाचत नाही…
कारण मी बोलत नाही,
कारण मला 'बोलणं शोभत नाही' असं समाज शिकवतो,
कारण मी रडले तर 'कमकुवत',
आणि हसले तर 'उधळट' ठरते…
मी फक्त एवढंच सांगू इच्छिते,
मी बायको आहे…
पण माझ्या मनात अजूनही एक प्रेयसी जिवंत आहे…
जी रोज तुमच्या डोळ्यांत प्रेम शोधते,
रोज तुमच्या एका मिठीच्या आठवणीत जगते,
आणि रोज स्वतःच्या अस्तित्वाला विसरून
तुमचं जग बहरत ठेवते…
सुनिल पुणे TM 9359850065
(प्रत्येक स्त्रीच्या अंतर्मनातून उमटलेली ही ओळ... जर का तुमच्या हृदयाला स्पर्श झाली असेल, तर हा लेख तुम्हालाच समर्पित आहे.)
Comments
Post a Comment