"पुरुषाचंही एक 'माहेर' असावं..."

*"पुरुषाचंही एक 'माहेर' असावं..."*
लेखक – सुनिल पुणे TM 9359850065

जसं स्त्रीसाठी माहेर म्हणजे आधाराचं, मायेचं आणि मन मोकळं करतं घेण्याचं ठिकाण असतं, तसंच पुरुषासाठीही काहीतरी असायला हवं ना? स्त्रीला माहेरी जाताना डोळे भरून येतात – कारण ती तिथं "ती" असते, सून, बायको, आई हे सगळं न विसरता फक्त "मुलगी" म्हणून मोकळी होते. पण पुरुषाला हे स्वातंत्र्य, हा निवांतपणा फारसा मिळत नाही.

संकटं असो की ताणतणाव – तो पुरुष "मजबूत" असण्याच्या समाजाच्या कल्पनेखाली गप्प बसतो. त्याला ना रडण्याची मुभा असते, ना थकण्याची. तो आयुष्यभर फक्त "जबाबदारी" पेलत राहतो. आई-वडील म्हातारे झाले की त्यांचा आधार, बायकोसाठी कणा, मुलांसाठी हिरो, समाजासाठी यशस्वी माणूस – पण तो स्वतःसाठी कोण?

उदाहरण द्यायचं झालं, तर आपल्या रोजच्या आयुष्यातले कितीतरी पुरुष असे असतात 

जसे शरदकाका, जे नोकरी संपल्यानंतर गावाकडं परतले, पण घरच्यांना त्यांची गरज उरलीच नव्हती. ना कुणी बोलायला, ना कुणी ऐकायला. एक दिवस मनातलं सगळं दाबून ठेवून आजारी पडले आणि नंतर... कायमचे निघून गेले.

दुसरं उदाहरण – विशाल नावाचा एक तरुण. आई-वडील, बायको, मुलं – सगळ्यांसाठी जीव तोडून काम करतो, पण कधी त्याला कोणी विचारलं की "कसा आहेस तू?" त्याचंही एक 'माहेर' हवं होतं – जिथे तो कोणाचंही भान न ठेवता, मनातलं बोलू शकेल, रडू शकेल, हसू शकेल.

पुरुषांचंही एक 'माहेर' असायला हवं – कदाचित मित्र, एखादा भाऊ, एक समजूतदार बायको किंवा एखादं शांत ठिकाण – जिथं तो "माणूस" म्हणून स्वतःला व्यक्त करू शकेल. समाजाने पुरुषाला सुद्धा हक्क द्यायला हवेत – भावनांचे, थकव्याचे, आणि आधार घेण्याचे.

स्त्री माहेरी जशी सावरणारी, तशी पुरुषासाठीसुद्धा एक "भावनिक माहेर" असणं गरजेचं आहे. कारण शेवटी तोही माणूस आहे – त्यालाही कुणी "मुलगा" म्हणावं, डोक्यावरून हात फिरवावा, आणि म्हणावं – "ठीक आहे रे, थकला असशील... पण मी आहे ना!"

सुनिल पुणे TM 9359850065, topsunil@gmail.com. 
*(छोटासा प्रयत्न – पुरुषांच्या मनाचा आवाज शब्दांत मांडण्याचा)* 06/05/2025

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?