स्त्री – भावना, बळ आणि अस्तित्वाचा गूढ प्रवास

*"स्त्री – भावना, बळ आणि अस्तित्वाचा गूढ प्रवास" ✍️ सुनिल पुणे TM 8007939422*

*स्त्री म्हणजे केवळ शरीर नव्हे, ती एक भावना आहे…* एक नाजूक कवचात लपलेली जिद्द आहे… एक सतत वाहणारा त्यागाचा झरा आहे.

ती क्षणभर प्रेयसी असते, जीवनभर पत्नी असते… पण एकदा आई झाली की, ती काळाच्या पलीकडे आपलं अस्तित्व विसरून आपल्या अपत्यासाठी स्वतःला वेचून टाकते. अपत्याला संस्कारित, सक्षम आणि सभ्य नागरिक घडविण्याची तिची धडपड म्हणजे एक तपश्चर्याच असते. स्वतःची झोप, आवड, सौंदर्य, वेळ... सगळं बाजूला ठेवून ती फक्त एक ‘आई’ होते.

सहजीवनात साथ मिळाली, तर ती फुलते; नाही मिळाली, तरी न डगमगता झिजत राहते. घरातील इतर नातेसंबंध,  आईवडील, सासू-सासरे, भाऊ-बहीण, सगळ्यांना आपल्या मायेचा गंध देत ती आपली भूमिका निभावत राहते. आणि वयाची उतरती वाटचाल सुरु झाली की, एखाद्या दिवशी ती स्वतःसाठी काहीतरी करायला लागते,  एखादा छंद, एखादी कविता, एखादं हसू,  तेव्हा समाजाला ती ‘जगणं’ पचत नाही!

"स्त्री आहेस, स्त्रीसारखंच वाग!"
"घरातलं काम तुझं आहेच ना!"
"एवढं हसणं बरं दिसतं का!"

ही वाक्यं स्त्रीला दिवसातून अनेकदा ऐकावी लागतात. तिचं मत, तिची इच्छा, तिचं हसणं,  सगळ्यावर समाजाने बंधनं घातलेली असतात. ती ऑफिसमध्ये पुरुषांच्या बरोबरीने नोकरी करते, पण घरी आल्यावर पुन्हा तिची ओळख ‘स्वयंपाकघर’ आणि ‘कपड्यांचे गठ्ठे’ यापुरतीच मर्यादित राहते.

हे सगळं सहन करत ती फक्त एक "बोलकी शांतता" बनते.
मनात रडत राहते, ओठांवर हास्य असतं...
मनाच्या खोलात तिचं एक गुपित दु:ख दडलेलं असतं...
ज्याला समजून घेणारं कुणीच नसतं...

*ती एकटी, विधवा, घटस्फोटित झाली आणि जर का तिच्या आयुष्यात एखादी व्यक्ती आली, जिला वाटलं की "मी तिच्या मनाचा ठाव घेईन", तर दुर्दैवाने ती व्यक्तीही अनेक वेळा तिच्या मनाऐवजी तिच्या शरीराला महत्त्व देते.* तिच्या भावना, तिची तडफड, तिचं ‘माणूसपण’ दुर्लक्षित करून तिला एक टाईमपासचा पर्याय समजतो,  हे स्त्रीसाठी पुन्हा एक भावनिक मृत्यू असतो.

*स्त्री प्रेमाची भुकेलेली असते...* पण ती प्रेम मागत नाही, ती प्रेम "समजून" घेणं मागते. तिच्या मनाला, तिच्या विचारांना, तिच्या अस्तित्वाला ज्या दिवशी समाजाने मनापासून मान दिला, त्या दिवशी खरं स्त्रीस्वातंत्र्य सुरू होईल.

ती कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडण्यास, कोणाशी मन मोकळं करण्यास, कोणाच्या मिठीत विसावण्यासाठी "मूल्य" असलेली व्यक्ती शोधते,  पण किती दुर्दैवाची गोष्ट की, ती व्यक्ती अनेक वेळा तिच्या आयुष्यात उशिरा किंवा कधीच येत नाही...

आजही समाज स्त्रीला "सन्मानाने जगू" देतोय का?
की तिचं आयुष्य फक्त त्याग, जबाबदारी, संयम, आणि उपयोगितेच्या चौकटीतच मर्यादित आहे?

हा लेख फक्त एक स्त्रीचं दु:ख सांगत नाही,  तो तिचं सामर्थ्य, तिची सहनशीलता, आणि तिच्या भावना 'पुनः' अधोरेखित करतो.

जग जसं पुढे जातंय, तसं आपण एक गोष्ट विसरतोय, 
स्त्री म्हणजे केवळ शरीर नव्हे, ती एक पूर्ण माणूस आहे,  स्वप्नं, भावना, विचार आणि आत्मसन्मान यांचा सुगंधी संगम!

आणि ही जाणीव जर आपल्या मनात आली, तर कुठलाही लेख, कुठलाही संदेश... अर्धवट राहणार नाही.

🌸 हा लेख तिच्यासाठी आहे, जी शांतपणे जगतेय, हसतेय, पण आतून कुठंतरी रडतेय... तिच्या मनातल्या प्रत्येक भावना माझ्या शब्दांत उतरवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com 
(तिच्या अंत:करणाचा आवाज समजून घेणारा एक मित्र)

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?