बाप आपल्या सोबत असला की… आपण जगाचा बाप असल्यासारखं वाटतं…
बाप आपल्या सोबत असला की… आपण जगाचा बाप असल्यासारखं वाटतं…
सुनिल पुणेTM 9359850065
बाप म्हणजे छत्र… सावली… आधार… आणि एक अशी शांत शक्ती, जी कधी बोलत नाही पण सतत आपल्यामागे उभी असते. आईचं प्रेम जसं उघड असतं, तसं बापाचं प्रेम गुपचूप… पण खोल असतं. बाप कधी हसत नाही, लाड करत नाही, पण त्याच्या प्रत्येक श्रमात, त्याच्या कपाळावरच्या घामाच्या प्रत्येक थेंबात आपल्यासाठीचं प्रेम असतं.
आपण लहान असतो तेव्हा वाटतं की बाप खूप कठोर आहे. तो ओरडतो, नियम लावतो, खर्च सांभाळतो, इच्छा मागे ठेवतो. पण मोठं झाल्यावर समजतं – ही कठोरता म्हणजेच आपल्यासाठीची शिस्त होती, भविष्याची काळजी होती. बाप सोबत असतो तेव्हा पाठीवर हात असतो. मनात एक हिम्मत असते – “काही झालं तरी बाबा आहे ना…”
पण… एक दिवस बाप जातो…
आणि मग समजतं की आपण खरंच पोरके झालो. घरात सगळं आहे, पण काहीतरी नाही. रोज सकाळी चहाच्या टेबलावर तो दिसत नाही. दारात उभं राहून वाट बघणारी नजर उरलेली नाही. हातात घड्याळ न बघता "उशीर झाला का?" विचारणारा तो आवाज नाही.
पैशाने काही कमी नसतं, पण आत्मविश्वास कमी पडतो. कारण जो बाप आपल्याला बिनधास्त बनवतो, जो संकटांसमोर उभं राहायला शिकवतो… तोच गेला असतो.
त्याच्या जुन्या वस्तू उचलताना डोळे पाणावतात त्याचा शर्ट, त्याची चप्पल, त्याचा चष्मा – सगळं जणू बोलत असतं. त्याच्या आठवणी घरभर विखुरलेल्या असतात. आणि मग एक दिवस अचानक आपण आरशात पाहतो… आणि जाणवतं आपण हळूहळू त्याच्यासारखे होत चाललोय…
बाप असतो तेव्हा आधार असतो…
बाप जातो तेव्हा आठवणींचा भार असतो…
पण त्याने दिलेली शिकवण, संस्कार, आणि मनगटात भरलेली ताकद… तीच पुढचं आयुष्य चालवते.
तो नसतो, पण त्याचं अस्तित्व, त्याची छाया आयुष्यभर आपल्यासोबत चालत राहते…
स्नेहपूर्वक,
सुनिल पुणे TM, 8007939422, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment