हक्काचं घर... एका स्त्रीच्या अंतर्मनाची मनस्वी आशादायक हाक

हक्काचं घर... एका स्त्रीच्या अंतर्मनाची मनस्वी आशादायक हाक, शब्दांकन सुनिल पुणे TM 8007939422

ती जन्मते, नाजूकसा श्वास घेते, आईच्या कुशीत विसावते. पण जन्माच्या क्षणापासूनच तिच्या वाट्याला येतो "परके पणाचे घर"...
घरात लाडकी असते, पण तिचं अस्तित्व एका वाक्यात बांधलं जातं "आपली मुलगी परक्याच धन"
म्हणजेच काय तर तिचं बालपणही एका उधारीच्या सावलीत जातं...

ती हसते, शिकते, स्वप्नं बघते... पण सगळ्या स्वप्नांचं उत्तर एकच  "सासर म्हणजेच तिचं खरं घर!" पण जेव्हा ती सासरी जाते, तिथंही तिला घर सापडत नाही...कारण इथं ती सून असते, बायको असते, पुढे आई बनते...पण कधीच "फक्त ती" म्हणून ओळखली जात नाही. तिचं अस्तित्व नेहमी नात्यांच्या नावाने ओळखलं जाते  कुणाची तरी 'लेक', कुणाची तरी 'सून', कुणाची तरी 'आई'...आजी व सासु

पण ती कधी विचारते का स्वतःला  "माझं हक्काचं घर नक्की कुठे आहे?"
कुठे आहे तो कोपरा, जिथे ती आवाज न वाढवता रडू शकते? जिथे तिला उत्तर न देता फक्त शांतपणे समजून घेतलं जातं? जिथे ती तिच्या झालेल्या चुकांसकट स्वीकारली जाईल...?

खरं तर हक्काचं घर म्हणजे चार भिंती नसतात, तर
ते असतात,  ती जिथं "स्वत:साठी" असू शकते...
ती जिथं नाती निभावते म्हणून नाही, तर जिथं नातंही तिची साथ निभावतात. 
जिथं तिच्या थकव्याची जाणीव होते,
जिथं तिच्या प्रत्येक कर्तृत्वामागचं श्रम आणि समर्पण ओळखलं जातं,
जिथं तिला विचारण्याची गरज पडत नाही  "मी बोलू का?"
जिथं तिला नुसत्या अस्तित्वासाठीही आदर मिळतो 
तिथंच तीचं खरंखुरं, हक्काचं घर असतं! दारावर तिच्या नावाची कोरीव पाटी असते ...एक आशा !

आजच्या काळातही, ती सतत घर शोधते, तिला हवाय असा एक कोपरा, जिथं तिला तडजोडीची नाही तर समजूतदारपणाची साथ मिळेल,
जिथं तिचं मौन ऐकलं जाईल, आणि तिचा आनंद साजरा केला जाईल.

प्रत्येक भारतीय स्त्रीच्या अंतर्मनात हा प्रश्न आजही खोलवर रुजलेला आहे 
"माझं हक्काचं घर नक्की कुठे आहे?"

या प्रश्नाचं उत्तर तिच्यातल्या प्रत्येकाच्या आसपासच आहे...
पण त्यासाठी फक्त "घर" नाही, तर मनांची उब, समजूतदार ह्रदयं, आणि नात्यांमधली खरी ओळख हवी.
कारण घर म्हणजे फक्त राहणारी जागा नाही, 
घर म्हणजे ती जिथं स्वतःसारखी राहू शकते... बिनधास्त, अगदी बिनधास्त हसत, रडत आणि हुर्डत!

मी सुनिल पुणे, हा लेख, तिच्या हक्काच्या त्या शोधासाठी जिचं आयुष्य झाडासारखं आहे, जे कुठंही रुजलं तरी सावली देतंच...अगदी ते झाड असे पर्यंत 

पण तिलाही कधीतरी हवी असते एक जागा 
फक्त स्वतःसाठी... हक्काची... प्रेमाची... शांततेची..आपुलकीची !

सर्व जगभरातील आदरयुक्त, सर्व श्रेष्ठ आणि खास करून भारतीय महिलांस हा लेख समर्पित…करतो.

शब्दातून सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?